सद् गुरू श्री. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर जयंती...


 ll श्रीराम समर्थ ll 

सर्व साधनाचे  मूळ l रामनामाची केवळ ll 

तत्त्वज्ञान योगध्यान l रामनामी जाहले लीन ll 

सर्व साधन आटाआटी l रामनाम ठेवा कंठी ll 

दास म्हणे नाम अंत: करणी l तोची जाणा आत्मज्ञानी ll 


"अखंड नामात राहणे म्हणजेच मोक्ष" असे अत्यंत विश्वासाने ज्यांनी सांगितले, ते सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे भारतीय अध्यात्म जीवनातील थोर नाम प्रसारक होते. आज माघ शुद्ध द्वादशी म्हणजे त्यांची जयंती होय. या प्रयोजनाने हे चिंतन.

        गेल्या पाच-सहा हजार वर्षांच्या जगाच्या इतिहासामध्ये जगात अनेक संस्कृती निर्माण झाल्या. त्यापैकी आजतागायत भारतीय संस्कृतीच फक्त आपले अस्तित्व टिकवून आहे, याचे कारण काय  असेल तर भारतीय "अध्यात्मविद्या" होय. आज वैज्ञानिक शोधांच्या माध्यमातून भौतिक सुख - सुविधा सर्वत्र सहजपणे उपलब्ध असूनही, मानसिक समाधानाची मात्र उणीव भासत राहते आहे, कारण या सुख सुविधा उपभोगण्याचे शरीर सामर्थ्य संपल्यानंतर पुढील मार्ग काय ? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक विविध प्रश्न निर्माण होतात, आणि मग भगवंताची आठवण येते. त्यावेळेस पुरेसा अवधी नसतो, परिणामतः प्रपंचात गुरफटलेल्या सामान्यजणांना वेळीच जागे करण्याचे महत् कार्य श्री महाराजांनी केले, आणि सर्वांना सहज सोपे असे नाम साधन करण्याचा अत्यंतिक आग्रह श्री महाराजांनी केला. अध्यात्म परंपरेतील मोक्ष प्राप्तीचे म्हणजेच, जीवनाचा खरा अर्थ समजावून समाधान मिळवण्याचा प्रयत्न ज्ञानमय साधन व भक्तीमय साधन या दोनच प्रकारे केला जाऊ शकतो, पण श्री महाराजांनी "सर्व साधनांचे मूळ l रामनामची केवळ ll" असे सांगून नामस्मरण हाच सर्व ज्ञानमय व भक्तिमय साधनांचा राजा आहे, असे खूप विश्वासाने सांगितले. त्यांनी सांगितलेल्या नाम साधनाचा जर श्रद्धायुक्त अंतकरणाने आचरण केल्यास सात्विक अनुभवाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

       अगदी बालवायापासूनच श्री ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, यांच्याप्रमाणे त्यांना आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव होती. गुरुप्राप्तीच्या शोधार्थ त्यांना पू. साध्वी राधाबाई, श्री. आण्णाबुवा, श्री. देव मामलेदार अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ, हुमनाबादचे श्री. माणिक प्रभू श्री. तेलंगास्वामी, श्री. रामकृष्ण परमहंस इत्यादी सिद्ध पुरुषांचा सहवास लाभला. अखेर येहळे गावचे श्री. तुकाराम चैतन्य यांनी श्री. महाराजांना अनुग्रह दिला व रामदासी दीक्षा दिली. "श्रीराम जय राम जय जय राम" त्रयोदशाक्षरी मंत्राची रामोपासना करावी व त्याच्याच प्रसाराचे कार्य करावे असे त्यांना सांगितले.

       अशाश्वत देहामुळे मानवी मनाची तृप्ती कधी होत नाही. मनाच्या तृप्तीसाठी मन भगवंताच्या जवळ गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजेच खरी साधना होय, अशी त्यांची शिकवण होती. याही पुढे जाऊन ते हा विश्वास देतात की, ज्याचे मन भगवंतापाशी गुंतून जाते, त्याच्या मनामध्ये भगवंताचे गुण आपोआप उतरतात व जीवनाला वेगळे तेज येते, जीवन कृतकृत्य होते.

       भगवंताचे अनन्य ओढ ही साधण्याची पहिली पायरी असे ते सांगतात. भगवंताची ओढ प्रपंचातल्या आघात व संकटांना लागते, यातूनच साधकाला नित्यानित्यविवेक निर्माण होतो आणि साधकाचे मन स्थिर होते, असे ते सांगतात. सूर्यतेज्याप्रमाणे असणारे श्री. महाराजांचे विचार सामान्य साधकाला  अगदी सोप्या मार्गाने सिद्धावस्थेत पर्यंत पोहोचवतात. श्री. महाराजांनी कधीही याचे कर्तेपण स्वतःकडे घेतले नाही. "श्रीराम कर्ता" या भावनेने ते मान सन्मानापासून निरासक्त राहिले.

        श्री. महाराजांचा साधक वर्गाचा विचार केला असता, सर्वसामान्य प्रापंचिक व अज्ञ असलेला दिसतो. श्री. महाराजांना वाटते की विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, अभिमानाने निष्ठा कमी होते. त्यामुळे श्रद्धायुक्त नामस्मरणाचा त्यांचा अत्यंत आग्रह होता. म्हणूनच ते म्हणतात,

 तत्त्वज्ञान योगध्यान l रामनामी जाहले लीन ll असे म्हणतात. एका राम नामाशिवाय अन्य साधने पूर्ण संभवत नाहीत. ज्याप्रमाणे एखाद्या राजाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला नोकरीचे कष्ट माहीत नसतात, त्याप्रमाणे जे साधक नामापरते सत्य नाही, ही भावना मानतात त्यांना साधनाचे कष्ट नाहीत.

       श्री. महाराजांच्या विशिष्ट गुण असे होते की, साधकाने त्याचा अभ्यास केला असता त्याची परमार्थिक उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. साधी वृत्ती, लीनता, सहनशीलता, निरलसता, संतोष, आर्जव, जनप्रियत्व, कोणतेही गोष्ट मनापासून करणे, झाल्यागल्याचा विसर आणि पुढचा विचार इत्यादी गुणांच्या आधारे ते व्यवहाराचा परमार्थासाठी भरपूर उपयोग करावा, असे ते सांगतात. प्रपंचाला भगवंताकडे वळवले की  दुःख नाहीसे होते, हा श्री महाराजांच्या शिकवणुकीचा मूळ मुद्दा होता.

        श्री. महाराजांनी भगवंताच्या निष्ठेसाठी आपले अवघे जीवन वाहून टाकले. जेथे श्री. महाराजांनी सांगितलेले नाम असते तेथे श्री. महाराजांचे खरे अस्तित्व अनुभवास येतेच येते. नामस्मरणाचा अभ्यास हेच आत्मज्ञान होय, आणि म्हणूनच ते सांगतात,

दास म्हणे नाम अंतकरणी l 

तोची जाणा आत्मज्ञानी ll 

श्रीराम.


अजय चंद्रकांत धुमाळ, भोर.


(संदर्भ: ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाड़मय)

Comments